एकेकाळी मुंबईत 'मटा'ला काट्याची टक्कर देणारी आणि 'लोकमान्य लोकशक्ती' असं भारदस्त बिरुद मिरवणारी 'लोकांची सत्ता' सध्या पुण्यात अक्षरशः व्हेंटिलेटरवर आहे. गडकरी, टिकेकर यांच्यासारख्या दिग्गजांनी ज्या वृत्तपत्राचा दबदबा निर्माण केला, त्या वृत्तपत्राची पुणे आवृत्ती आता डबघाईला आली असून येत्या वर्षाअखेर ती गुंडाळण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
सुरुवातीलाच 'कॅप्टन' चुकला अन् गाडी घसरली!
१९९० मध्ये या वृत्तपत्राने मोठ्या थाटात पुण्यात एन्ट्री घेतली होती. व्यवस्थापन आणि वितरण विभागात वर्गीस, संजय, राणे, सावरकर अशी तगडी फळी होती, तर संपादकीय विभागातही अनुभवी 'खोंड' आणि मोठी नावं होती. मात्र, संघाचा 'कॅप्टन' निवडतानाच व्यवस्थापनाची मोठी गफलत झाली. त्यावेळी पुण्यातील एका अग्रगण्य दैनिकातील साबडे, भिडे, भोंगळे, खोले ही नावं चर्चेत होती; पण या मंडळींनी आपल्या मूळ संस्थेशी इमान राखलं. अखेर अत्यंत सभ्य आणि नेमस्त स्वभावाचे 'अनिल' व्यवस्थापनाच्या जाळ्यात अडकले. पुण्याच्या आक्रमक पत्रकारितेत डायनॅमिक नेतृत्वाची गरज असताना मवाळ कॅप्टन मिळाल्याने पहिल्याच दिवसापासून सुरू झालेली घसरण आज पार तळाला जाऊन पोहोचली आहे.
'ना आडात, ना पोहऱ्यात' आणि 'वरकमाई'चा धंदा!
पूर्वी मुंबई आवृत्तीच्या नफ्यावर पुण्याचा गाडा ओढला जायचा, पण आता खुद्द मुंबईचीच आवृत्ती तोट्यात असल्याने पुणे आवृत्तीची अवस्था 'ना आडात, ना पोहऱ्यात' अशी झाली आहे. त्यातच डिजिटल एडिशनचं भूत मानगुटीवर बसल्याने पुण्यातल्या वार्ताहरांची सकाळी आठ ते रात्री बारा अशी अक्षरशः पिळवणूक सुरू आहे.
कामाचा डोंगर आणि तुटपुंजी मिळकत यामुळे इथल्या वार्ताहरांवर आता 'वरकमाई' करण्याची वेळ आली आहे. अगदी मार्केटयार्डचा 'लखपती' पुरस्कार मिळवलेल्या अनेक वार्ताहर इतर वृत्तपत्रांना बातम्या पुरवून आपलं पोट भरत असल्याची जोरदार चर्चा आहे. या 'बाहेरख्याली' पत्रकारितेच्या तक्रारी थेट संपादक 'कुबेर' यांच्या दरबारी जाऊन धडकल्या आहेत.
सहा महिन्यांची मुदत; अन्यथा 'राम नाम सत्य'!
आवृत्तीला लागलेली ही घरघर रोखण्यासाठी आठवड्याभरापूर्वी मुंबईत व्यवस्थापनाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काही जुन्या आणि सुस्त मंडळींना डच्चू देऊन नव्या दमाची भरती करण्याचा निर्णय झाल्याचं समजतंय. मात्र, ही अखेरची संधी असेल. नव्या भरतीनंतर पुढच्या सहा महिन्यांत जर वृत्तपत्राने बाळसं धरलं नाही, तर पुणे आवृत्तीला कायमचं टाळं ठोकण्याचे संकेत व्यवस्थापनाने दिले आहेत. आता या सहा महिन्यांत 'लोकांची सत्ता' पुन्हा उभारी घेते की पुण्यातून गाशा गुंडाळते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे!
0 टिप्पण्या